मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गाव प्रवेश बंद व निवडणूकीवर बहिष्कार;*ग्रामपंचायत मध्ये सर्वानुमते ठराव मंजूर
माहूर तालुका प्रतिनिधी बजरंगसिंह हजारी
:- मराठा आरक्षणाच्या मागणीची धगधगती ज्वाला राज्यातील महानगरांपासून ग्रामीण भागात देखील पोहचली असल्याचे दिसून येत असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यात सुरु असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ माहूर तालुक्यातील हडसनी येथे सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने दि.२५ ऑक्टोबर पासून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्मारकासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.त्याआधी सर्व राजकीय पुढारी/नेत्यांना गाव ‘प्रवेश बंद’ व येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर मराठा आरक्षण मिळेपर्यंत ‘बहिष्कार’ टाकण्याचा महत्वपूर्ण ठराव ग्रामपंचायत हडसणीच्यावतीने एका विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
चुलीत गेले नेते आणि चुलीत गेला पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष ! मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीयराजकीय पक्षाच्या नेत्यास गावात प्रवेश नाही, व येणाऱ्या आ निवडणूकीवर बहिष्कार राहील. असा स्पष्ट इशारा शासनाला देण्यात आला असून,आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा.आजवर लढलो मातीसाठी, एकदा लढा जातीसाठी! असा शासनाला सज्जड दम देणारा निर्धाराचा लक्षवेधक फलक सकल मराठा समाज, हडसणी, ता.माहूर यांच्यावतीने सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषण स्थळी लावण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यभरात सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जे आंदोलन सुरु आहे त्यामध्ये जरांगे पाटील यांनी राज्य शासनास दिलेली मुदत ही दि. २४ रोजी संपलेली असतांना देखील राज्य शासनाकडून याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घोषित केलेल्या पुढील आंदोलनास मौजे हडसनी ता.माहूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलाअसून, ग्रामपंचायत हडसनी यांनी मराठा आरक्षण मिळे पर्यत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीसह आरक्षण मिळेपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव एका विशेष सभेचे आयोजन करून सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
सरपंच सौ.शिला अर्जुनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करने व यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणे बाबत सूचक सौ.स्मिता अवधूत जाधव यांनी सदरविषयी सूचविल्यानुसार महाराष्ट्र राज्यात सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मागणी चालू असून,प्रत्येक वेळी राजकीय पुढारी/नेत्यांकडून फक्त आश्वासनं दिल्या जात आहेत.तरी मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मौजे हडसनी गावात सर्व राजकीय पुढाऱ्यांना/नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्याचे ठरविण्यात आले असून,येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये सहभागी न होणे व मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.सौ.शुभांगी रामचंद्र इंगोले यांनी अनुमोदन दिल्यावरुन सदर ठराव क्रमांक ०६ सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
तर याच मागणीसाठी मराठा आरक्षण जाहीर होईपर्यंत मौजे हडसनी येथील सकल मराठा समाज बांधव हे दि.२५ ऑक्टोबर पासून हडसनी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छ.शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर बेमुदत साखळी उपोषणाला बसलेले आहेत.आज गुरुवारी उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
याबाबतचे लेखी निवेदन उपोषणापूर्वी जिल्हाधिकारी नांदेड यांना माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्फत २४ ऑक्टोबर रोजी निवेदक उपोषणकर्ते/सकल मराठा समाज मौजे हडसनी तर्फे सुनील शेषेराव वानखेडे यांनी आपल्या स्वाक्षरीने दिले आहे.