यवतमाळमध्ये जिल्ह्यातील पूसद-दिग्रस मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. पुसद दिग्रस मार्गावर असलेल्या बेलगव्हान घाटात ऑटो वाहनाला अपघात झाला आहे. अॅपे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे.
यवतमाळच्या बेलगव्हान घाटात हा भीषण अपघात झाला आहे. सर्व प्रवासी हे मोहा तांडा, टोकी तांडा, पांढुरणा, सिंघनवाडी येथील रहिवासी आहेत. पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी आयोजित केलेल्या जेवणाच्या कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अॅपे उलटला. या अपघात इतकी भीषण होता की वाहन उलटल्यानंतर त्यातील 5 प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर, 11 प्रवासी जखमी झाले आहेत.
दरम्यान, गावाकडील भागात सार्वजनिक वाहनांची कमतरता असल्याने वाहतुकीसाठी खासगी अॅपेचा वापर केला जातो. मात्र, कधीकधी यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जातात. प्रवाशांची संख्या जास्त असल्याने वाहनांवर लोड येतो. अशावेळी हे अपघात घडले जातात. अनेकदा अशा प्रकरणांत आरटीओ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी केली जाते.