यश मिळवण्यासाठी प्रयत्नात सातत्य असणे व परिश्रमात जिद्द व चिकाटी असली तर क्षेत्र कुठलेही असो त्यात सुयश मिळाल्या शिवाय रहात नाही असे मार्गदर्शनपर मनोगत आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांनी व्यक्त केले.
येथील स्व.उत्तमराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कुल व मातोश्री शांताबाई तू. चव्हाण विद्यालया च्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थाना वरून ते बोलत होते.
पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की संकटे माणसाच्या आयुष्यात येतच असतात पण अशा वेळी खंबीरपणे संकटाचा मुकाबला करता आला पाहिजे.
आर्णीतील उर्स च्या निमित्ताने नागरिकांनी यात्रेत जातांना दागिने परिधान करून यात्रेत जाऊ नये,यात्रेत जातांना घराला व्यवस्थित कुलूप लावावे. मोजकेच पैसे सोबत ठेवले पाहिजे कारण गर्दीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो म्हणून खबरदारी घेतली पाहिजे असे आवाहन सुध्दा त्यांनीं यावेळी केले व विध्यार्थी बांधवांच्या कला गुणांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून सेवा निवृत्त गटशिक्षणाधिकारी किशोर रावते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे अध्यक्ष डॉ.पंडितराव चव्हाण, व्यवस्थापक उल्हास चव्हाण,गणेश मोरे,शाळेचे मुख्याध्यापक मंगेश ब्रम्हकार,पंकज ठाकरे उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका दहीकर ,कांबळे यांनी तर आभारप्रदर्शन प्रगती दिवे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
