ओबीसी आरक्षण परिषदेची भव्य सभा यवतमाळ येथे संपन्न
ओबीसी आरक्षण परिषद विचार विनिमय सभा यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने एमडब्ल्यू पॅलेस येथे सोमवार दिनांक-१५ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता संपन्न झाली. सभेस ओबीसी बांधवांचा उत्स्फूर्तपणे प्रचंड प्रतिसाद लाभला. इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात सामाजिक, आर्थिक जनगणनेचा व 50 टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करून प्रत्येक घटकाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचा उल्लेख केल्याने ओबीसी समाजात उत्साह दिसून आला.
*जो ओबीसी की बात करेगा वही देश मे राज करेगा* च्या घोषणा दुमदुमल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार संजयभाऊ देशमुख, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार ख्वाजा बेग साहेब, माजी जी प अध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर , ncp अध्यक्ष वर्षाताई निकम, शिवसेनेचे राजेंद्रजी गायकवाड, किशोरजी इंगळे, यांनी ओबीसी मेळाव्यास भेट दिली. ओबीसी आरक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रदीपजी वादाफळे, शैलेशजी गुल्हाने, सतिशभाऊ भोयर, अशोकराव तिखे, प्रकाशराव जानकर, प्रा.प्रकाशजी फेंडर सर, सीमाताई तेलंगे यांनी सभेस संबोधित केले. याप्रसंगी ओबीसींच्या साठी २० वर्षाचा केलेला संघर्ष मांडत आर्थिक, सामाजिक जातनिहाय जनगणना व्हावी व ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवावी तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना 100 टक्के स्कॉलरशिप मिळावी, प्रत्येक तालुक्यात ओबीसी मुला मुलींचे वसतिगृह व्हावे अशा महत्वाच्या विविध बाबीची पूर्तता होण्याविषयी सर्वांनी पोटतिडकीने मांडणी केली. इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात वरील ओबीसींच्या मागण्या अंतर्भूत असल्यामुळे ओबीसी समूहाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
हरीश कुडे यांनी या सभेचे संचलन केले तर अनिल महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले.