गेली दोन दिवस महा विकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचा फार्मूला ठरला असून प्रत्येकी ९६ जागा घेण्यावर तिन्ही पक्षाचे एकमत झाले असून गेली दोन दिवस उद्धव ठाकरे याची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक होऊन आज कोणी लहान मोठा भाऊ नसून तिघेही तीळे भाऊ असल्याचा मध्यम मार्ग काढण्यात आला त्यानुसार सर्वाना ९६ जागा मिळतील व ज्या पक्षाच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीत ‘तिळे’ भाऊ, तिन्ही पक्षांना प्रत्येकी ९६ जागा, वादाविना सूत्र ठरलं
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी ९६ जागा वाटून घ्यायच्या आणि आपल्या मित्रपक्षांना आपल्यातील जागा द्यायच्या, अशा प्रकारचे प्राथमिक सूत्र ठरले
– महायुतीला पराभूत करण्यासाठी आघाडीची रणनीती
– आघाडी अभेद्य राहण्यासाठी वितुष्ट, विलंब टाळण्याचे प्रयत्न
– ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार
महाराष्ट्र टाइम्स
महाविकास आघाडी अभेद्य राहिली तरच लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा पराभव शक्य असल्याचे आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागावाटपावरून निर्माण होणारे वितुष्ट आणि विलंब टाळण्याचे ठरवले आहे. जागांवरून विनाकारण दावे-प्रतिदावे करण्याऐवजी आघाडीतील प्रमुख तीन पक्षांनी वाटपात समसमान जागा घेण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांचा ‘राष्ट्रवादी’ गट अशा तिन्ही पक्षांना प्रत्येकी ९६ जागा वाटून घ्यायच्या आणि आपल्या मित्रपक्षांना आपल्यातील जागा द्यायच्या अशा प्रकारचे वाटपाचे प्राथमिक सूत्र ठरत असल्याचे समजते. शिवाय मुख्यमंत्रिपदावरून हेवेदावे करण्याऐवजी ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री, अशा प्रकारचाही ‘फॉर्म्युला’ आघाडीच्या शीर्षस्थ नेत्यांमध्ये चर्चिला जात असल्याचे समजते.
लवकरात लवकर जागावाटप पूर्ण
लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला पराभवाचा धक्का दिल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याने महायुतीला लोकसभेच्या ४८ पैकी केवळ १७ जागाच पदरात पाडून घेता आल्या. ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात काही जागांवरून विशेषत: मुंबईतील जागांवरून शेवटच्या क्षणापर्यंत घासाघीस सुरू होती. मात्र, त्याचा त्यांना फारसा फटका बसला नाही. असे असले तरी आता विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र जागावाटप लवकर पूर्ण करून प्रचारासाठी कसा जास्तीचा वेळ मिळेल, त्यावर आघाडीच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. जागावाटप लवकर पूर्ण करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत दावे-प्रतिदावे करताना जागांसाठी घासाघीस करण्याचे कसे टाळता येईल, यावर आघाडीचे नेते रणनीती आखत आहेत. लवकर जागा वाटप करून प्रचाराला अधिक वेळ देता येईल व संयुक्त प्रचार सभा घेण्यासाठी वेळ मिळेल आशा प्रकारे रणनीती ठरविण्यात येणार असल्याचे खात्रीलायक कळते.