अध्यात्म, समरसता आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणार्या संतांची जाकिर हुसैन व राजु पटेल यांनी घेतली विशेष भेट
आर्णी : भारत पाकिस्तान तणाव व देशात सुरू असलेला हिंदू मुस्लिम वाद या पार्श्वभूमीवर आर्णी मधील धडाकेबाज पत्रकार व समाज सेवक झाकीर हुसेन यांच्या घरी काशीच्या विख्यात संतांनी भेट देत सामाजिक व धार्मिक समरसते चा संदेश दिला.
हरियाणाचे प्रसिद्ध संत श्री श्री 1008 बाबा कालिदास कृष्णानंद परमहंस जी महाराज आणि काशी (वाराणसी) येथील संत श्री राम प्रपन्नाचार्य मौनी स्वामी जी यांची एक विशेष आध्यात्मिक भेट महाराष्ट्रात पार पडली. ही ऐतिहासिक भेट यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील ज्येष्ठ पत्रकार जाकीर हुसेन आणि मुंबईचे पर्यटन भूषण श्री राजू पटेल मलनस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
हे दोन्ही संत लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील जगनाळ बामणी येथे प्रस्तावित काशी विश्वनाथ मंदिराच्या भूमिपूजनासाठी आले होते. या प्रसंगी त्यांनी अध्यात्म, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मिती या विषयांवर सखोल चर्चा केली. परस्पर समन्वय, आध्यात्मिक जागृती आणि राष्ट्रीय सेवेसाठी नवदिशा ठरतील अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर मतविनिमय झाला.
ही अध्यात्मिक भेट मध्यप्रदेशातील अखिल भारतीय मां नर्मदा परिक्रमा सेवा संघाचे प्रदेश संयोजक श्री. प्रीतमसिंह चौहान यांच्या विशेष प्रयत्नातून शक्य झाली. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे ही आध्यात्मिक बैठक यशस्वीरीत्या पार पडली.
संतांच्या या भेटीमुळे समाजात अध्यात्मिक चेतना निर्माण होण्यास मदत होणार असून सामाजिक ऐक्य, समरसता आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश या माध्यमातून सर्वत्र पोहोचत आहे.