यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तहसीलमध्ये तालुक्यातील जवळा येथील शेतकरी गौतम गेडे याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आर्णी तालुक्यातील जवळा शिवारात या शेतकऱ्याची वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीलगत असलेला नाला वळविण्यात आल्याने शेतात नाल्याचे पाणी शिरले. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्याने आर्णीचे तहसीलदार परशराम भोसले यांच्याकडे वारंवार न्याय मिळावा, म्हणून दाद मागितली. तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजविले. त्याचा उपयोग झाला नाही. उलट प्रशासनाकडून प्रत्येक वेळी उडवा-उडवीची मिळाल्याने खचून गेलेल्या शेतकऱ्याने अखेर टोकाचे पाऊल उचलत तहसीलदारांच्या कक्षातच विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर बाब म्हणजे या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल न करता उलट शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत शेतकरीनेते रविकांत तुपकर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यावरच अशा प्रकारची कारवाई होत असेल तर या अधिकाऱ्यांची मस्ती उतरवावी लागेल, असे ते म्हणाले. न्यायासाठी शेतकऱ्याने तहसीलच्या कार्यालयात वारंवार चकरा मारल्या त्याला न्याय तर मिळत नाही उलट त्याचेवर गुन्हे दाखल करण्यात आले
हे गुन्हे परत घ्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच तापणार असल्याचे कळते.