देशद्रोहाचे कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांना पदावरून निलंबित करा – इरशाद खान
वणी/ प्रतिनिधी:
महाराष्ट्र आंध्रप्रदेशच्या सिमेवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील पिंपळखुटी येथे स्थापन करण्यात आलेला सिमा तपासणी नाका हे येथे कार्यरत अधिकाऱ्यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी झाल्या सारखा दिसून येत आहे. पिंपळखुटी येथे, महाराष्ट्राच्या परिवहन खात्याने गेल्या अनेक वर्षा आधी आर. टी. ओ. चेक पोस्टची निर्मिती केली होती.
ओव्हरलोड वाहतुक, वाहनांची कागदपत्रे, वाहन टॅक्स, वाहन चालकाचे परवाने, व शेजारच्या राज्यातून किंवा आपल्या राज्यांतून कोणत्याही जिवनावश्यक वस्तुंची तस्करीवर खास करून लक्ष ठेवण्याची जबाबदारी या सिमा तपासणी नाक्यावरकार्यरत अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली. मात्र येथील अधिकारी वाहन तपासणीच्या नावावर फक्त वाहन चालकांची आर्थिक लुट करतांना दिसून येत आहे. काही वाहनांचे सर्व कागदपत्रे पूर्ण असून सुद्धा त्याना या ठिकाणी पैसे द्यावेच लागतात. यामुळे तालुक्यात व जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंची तस्करी तथा ओव्हरलोड वाहतुकीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. हा सिमा तपासणी नाका अत्याधुनिक सुविधेसह पाटणबोरी गावापासून एक की. मी. अंतरावर स्थापन करण्यात आला आहे. आर. टी. ओच्या दलालांचे जीवनावश्यक व आमली पदाथांची तस्करी करणाऱ्यांशी लागेबांदे असल्यानेच ते कार्यवाही करण्यास टाळत असून त्यांच्या या कामचुकार व भ्रष्ट वृत्तीमुळेच या मार्गावरून जीवनावश्यक तथा आमली पदाथार्ची तस्करी वाढत आहे. त्यामुळे येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कृत्य हे देशाला लुटणारे असून देशद्रोही कृत्य असल्याने येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या संपत्तीची चौकशी करून येथील अधिकारी व कर्मचारी यांना बडतर्फ करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी क्षेत्रीय परिवहन अधिकारी यांच्याकडे केली आहे.
ओव्हरलोड वाहतुकीवर फक्त केसेस दाखविण्यापुरतीच कार्यवाही करण्यात येत असून इतर ओव्हरलोड वाहनांना हजारो रुपए घेवून सोडून देण्यात येत असल्याने या राष्ट्रीय महामार्गाची पुरती वाट लागलेली आहे. तसेच ओव्हरलोड वाहनांमुळे गाड्यांचे संतुलन बिघडल्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. येथे कार्यरत अधिकाऱ्यांनी ट्रक व इतर वाहन चालकाकडून अवैद्यरित्या पैसे वसूल करण्याकरितां गुंड प्रवृत्तीच्या लोकांची नियुक्ती केलेली आहे. ते स्वतःला परिवहन विभागाचे कर्मचारी असल्याचे सांगुन वाहन चालकाकडून बळजबरीने पैसे उखळत आहे. दररोज या अवैद्य वसुलीचा आकडा लाखाच्या घरात जात असल्याने हे आर. टी. ओ. चेक पोस्ट येथील अधिकाऱ्यासाठी सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडी सारखेच झाले आहे.
या चेक पोस्टच्या जवळच वणी आणि चंद्रपूर येथे कोळसा, लाईमस्टोन, डोलामाईट खाणीतून निघणारे गौण खनिज अवैद्यरित्या वाहतूक केली जाते. या ट्रकला ओव्हरलोड माल नेण्यासाठी आर. टी. ओ. कडून पास दिल्या जाते. त्यासाठी आर.टी.ओ या ट्रक चालकाकडून कडून ४००० /- रुपये हप्ता वसूल केल्या जाते. तर याच भागात मोठ मोठ्या विस्तीर्ण पात्र असलेल्या नद्यातून निघणारी रेती सुद्धा मोठ मोठ्या वाहनातून अवैद्य रित्या ओव्हरलोड नेल्या जाते. याही वाहनाकडून आर.टी.ओ वसुली करतात.
सीमावर्ती भागातील बहुतांश भाग हा नक्षलग्रस्त भाग असून दुसर्या राज्यातून आपल्या राज्यात हत्यारांची ने –आन करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून नक्षल आणि दहशतीला सुद्धा पाठबळ मिळत असल्याचे बोलण्यास हरकत नाही.
बाहेर राज्यातून येणारा आणि जाणारा गुटखा, कोळसा, लाईमस्टोन, डोलामाईट, सागवान, बोगस दारू, गांजा, अफिम, ड्रग्स, देह व्यापार करणारे टोळ्या, नकली नोटा, या सह अन्य तस्करांना मूकसंमती देऊन येथील आर.टी.ओ. गैरव्यवहाराला वाढवत आहे. आणि यातून देशाची संपती लुटण्याचे काम हे अधिकारी करत आहे. त्यामुळे हे सर्व कृत्य देश विरोधीच आहेत. त्यामुळे या सदर विषयात आपण स्वतः लक्ष घालून येथील सर्व अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून या भ्रष्ट व लुटमार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर करावी. असे न झाल्यास येत्या ८ दिवसात, राष्ट्र संपतीची होत असलेली लुट व नुकसान रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने येथे सीसीटीव्ही कॅमेरे घेऊन मनुष्यबळ उभे करून सर्व प्रकार आपल्या निदर्शनास आणून देण्यात असल्याचे मत इरशाद खान यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.