वणीतील स्कूल बसेसविरुद्ध मनसे आक्रमक: क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी..
वणी / प्रतिनिधी :
वणी शहरातील स्कूल बसेसकडून होणाऱ्या वाहतूक नियमांच्या सर्रास उल्लंघनावर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनेआवाज उचलला आहे. परमिट मुदतबाह्य झालेल्या, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने निकष पूर्ण न करणाऱ्या स्कूल बसेसवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक उपशाखा, वणी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
मनसे वाहतूक सेनेचे इरशाद खान यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वणी शहर शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि कॉन्व्हेंट शहरात कार्यरत असून, त्यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्कूल बस सुविधा सुरू केली आहे. यामुळे पालकांचा वेळ आणि पैसा वाचत असल्याने ते या सुविधेला प्राधान्य देत आहेत. मात्र, काही शाळा चालक या सुविधेचा गैरफायदा घेत सक्षम नसलेल्या वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करून अधिक पैसे कमवण्यावर भर देत आहेत.
निवेदनात नमूद केल्यानुसार, या प्रकारामुळे अनेक गंभीर अपघात होऊन निष्पाप जीवांचे बळी गेल्याची उदाहरणे आहेत. असे प्रकार घडल्यानंतर केवळ आक्रोश आणि श्रद्धांजली देण्यापलीकडे काहीही होत नाही. त्यामुळे भविष्यात असे अनुचित प्रकार टाळण्यासाठी मनसेच्या वाहतूक सेनेने पुढाकार घेतला आहे.
यात वणी शहरातील अनेक स्कूल बसेसचे परमिट मुदतबाह्य झाले आहेत. अनेक वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र नाही, चालकांकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे योग्य परवाने नाहीत. गाड्यांमध्ये प्रथमोपचार पेटी नाही आणि प्रत्येक वाहनात एक महिला वाहक असणे अपेक्षित असताना ती उपलब्ध नाही.
अनेक वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नेले जात आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर बाबींची दखल घेऊन, शहरात कार्यरत असलेल्या सर्व स्कूल बसेसची आकस्मिक तपासणी करावी, त्यांचे परमिट, वाहन चालक परवाना, वाहनाची क्षमता तपासावी आणि दोषी वाहनांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मनसे वाहतूक सेनेने केली आहे. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या वाहनांना शैक्षणिक क्षेत्रात वाहन चालवण्यास बंदी आणावी आणि त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी विनंतीही करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती शालेय शिक्षण मंत्री श्री. दादा भुसे, परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती परिक्षेत्र अमरावती आणि जिल्हाधिकारी साहेब, यवतमाळ यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. इरशाद खान यांनी आशा व्यक्त केली आहे की, वाहतूक पोलीस प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करेल. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितार्थ महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना रस्त्यावर उतरून या प्रकाराला पायबंद करेल असा इशारा सुधीर दिलेल्या निवेदनातून केला आहे..