दिव्यांग व्यक्ती हेळसांड प्रकरणी वाहकाविरुद्ध कारवाई करा !
अन्यथा बेमुदत आमरण उपोषण प्रहार दिव्यांग संघटनेचे आगार प्रमुखांना निवेदन.
माहूर प्रतिनिधी/अमजद खान
युडीआयडी कार्ड सादर केल्यानंतर सुद्धा दिव्यांग व्यक्तीस एसटी बस मधून उतरून दिल्याची घटना दि.१२ रोजी माहूर बसस्थानकात घडल्याने दिव्यांग हेळसांड प्रकरणी प्रहार दिव्यांग संघटनेने आक्रमक पवित्र घेतला असून हेळसांड करणाऱ्या एसटी वाहकाविरुद्ध कारवाई करा अन्यथा आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा प्रहार दिव्यांग संघटना माहूरच्या वतीने आगार प्रमुख माहूर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
माहूर येथील दिव्यांग व्यक्ती साई गोदाजी जगताप हा माहूर बसस्थानकात माहूर हून किनवट कडे जाणाऱ्या बस क्र. 8690 या बस मध्ये लिंबायत फाटा येथे जाण्यास चढला असता सदर वाहनाचा वाहक क्र. 31579 या वाहकाने शासनाला काही काम नाही आम्हाला लंगडयाचा नेहमीच त्रास आहे. असे म्हणून बसला लिंबायत येथे थांबा असतांना सुद्धा बस लिंबायत येथे थांबत नाही असे म्हणून बस मधून उतरविल्याने दिव्यांग इसम हा मदतीसाठी नागरिकांकडे जात असतांना गाडी अडविल्याचा आरोप करून शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना घडली. सदर घटनेची प्रहार दिव्यांग संघटनेने दखल घेतली असून सदरील वाहकाविरुद्ध कारवाई करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा आगरप्रमुख माहूर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनाच्या प्रति आमदार बच्चू कडू वाहतूक नियंत्रक रापम नांदेड तहसीलदार माहूर यांना दिल्या आहेत. निवेदनावर तालुकाध्यक्ष किशोर हुडेकर, सचिव गणेश जाधव, शहराध्यक्ष रुपेश जगताप, वाई सर्कल अध्यक्ष प्रभाकर नेवारे, जिया फारुकी आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.