आंबेडकरी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रकाश खरात
प्रा. वंदना महाजन करणार उद् घाटन.
ग्रामीण भागातील रसिकांना मिळणार वैचारिक मेजवानी.
यवतमाळ : ( प्रतिनिधी)
अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे पाचवे आंबेडकरी ग्रामीण साहित्य संमेलन पापळ येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर संमेलन १८ फेब्रुवारी रविवारला होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी लेखक डॉ. प्रकाश खरात यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ लेखिका प्रा. वंदना महाजन या संमेलनाचे उद् घाटन करतील अशी माहिती महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे यांनी दिली आहे.
संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झालेले ज्येष्ठ लेखक प्रकाश खरात हे वस्तुनिष्ठ आंबेडकरी विचारांच्या मांडणीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे दलित कथा : उगम आणि विकास, बुद्ध धम्माची चिंतन यात्रा, साहित्य समिक्षा: बदललेले मापदंड, आंबेडकरवाद: समाज आणि संस्कृती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर: क्रांती आणि संस्कृती आदी महत्वपूर्ण ग्रंथाबरोबरच त्यांचे एकूण अठरा ग्रंथ सुद्धा वाचकप्रिय आहेत. विविध विद्यापीठात त्यांची विविध पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहेत.
संमेलनाच्या उद् घाटक असणाऱ्या डॉ. वंदना महाजन या मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. त्या ‘आमची श्रीवाणी ‘ नियतकालिकाच्या संपादक देखील आहेत .
फुले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या असलेल्या वंदना महाजन यांचे मराठी कादंबरीतील स्रीवाद, सांस्कृतिक प्रवाहांची स्रीवादी समीक्षा, स्रीवाद आणि समाज परिवर्तन, स्रीवाद आणि मराठी साहित्य इ. ग्रंथ आणि वादळवाट हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित डॉ. महाजन या अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी जुळलेल्या आहेत.
संमेलनात परिचर्चेच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधन होणार असून अध्यक्षस्थानी प्रा. अशोक कांबळे हे असतील तर प्रमोद संबोधी, डॉ. भास्कर पाटील, डॉ. सुशील मेश्राम,डॉ. रूपेश कऱ्हाडे, प्रा. आत्माराम ढोक आदी चर्चक सहभागी होतील. सायंकाळच्या सत्रात कवी महेंद्र ताजणे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार असून विदर्भातील नामवंत कवी यात सहभागी होणार आहेत. कविसंमेलनाचे सुत्रसंचालन कपिल दगडे हे करतील.
प्रा. ज्ञानेश्वर खडसे यांच्यावर स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून जनार्दन मेश्राम हे मुख्य संयोजक आहेत. संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन धिरज लोखंडे,देवानंद पाटील, दिपक सवाई, अजय घरडे, बाळुभाऊ खडसे, देविदास खिराडे, अमोल वानखेडे, सचिन कोल्हे, विजय अजबले. संजय मोखडे आदींनी केले आहे.
शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे २०२४ हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याप्रती कृतज्ञता संमेलनाच्या निमित्ताने व्यक्त केली जाणार आहे. संमेलन परिसराला डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती परिसर, संमेलन सभागृहाला विमलताई देशमुख सभागृह आणि विचारमंचाला आकारामजी खडसे विचारमंच असे नाव देण्यात आलेले आहे.
१७ फेब्रुवारीला सायंकाळी समता सैनिक दलाच्या वतीने समता सैनिकांची रॅली सुद्धा आयोजित केली जाणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुखांच्या पुतळ्यापासून संमेलन स्थळापर्यंत या रॅलीचा मार्ग असेल. अमरावती जिल्ह्यातील समता सैनिक या रॅलीत सहभागी होतील.