फॅसिझम संपवण्यासाठी खऱ्या भारतीयत्वाची जाणीव महत्त्वाची
डॉ. यशवंत मनोहर
डॉ.मनोहरांच्या दोन ग्रंथाचे प्रकाशन
नागपूर ( प्रतिनिधी)
भारतीय लोकांनी भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारे भारतीयत्व समजून घेतले पाहिजे. आपण जर हे समजून घेतले तर फॅसिझम नष्ट होईल आणि लोकशाही स्पष्ट होईल. भारतीयत्व म्हणजे इहवादी, विज्ञाननिष्ठ, सलोखा, बंधुभाव, विषमतातितता आणि शोषणातितता अशी जाणीव आहे असे प्रतिपादन डॉ. यशवंत मनोहर यांनी केले. ते ‘भारतीय संविधान आणि भारतीयत्व’, ‘कविवर्य भाऊ पंचभाई’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी होते. पुस्तकांचे प्रकाशन माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. मनोहर म्हणाले, तथागत बुद्धांच्या श्रमण संस्कृतीमधून आजच्या भारतीयत्वाचा प्रारंभ झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात त्याचे निष्कर्षरूप साकारले आहे. भारतीयत्व स्त्रीपुरूषविषमता, अस्पृश्यता, जातीयता मानत नाही. आपण माणूस म्हणून या दुनियेचे एकमेव महानायक आहोत. आणि हे महानायकत्व नष्ट करणारी प्रत्येक गोष्ट अभारतीय आहे, म्हणून मनुस्मृती अभारतीय आहे. नरकाची संकल्पना ही जगातील सर्वात मोठी दहशतवादी गोष्ट असल्याचे त्यांनी सोदाहरण पटवून दिले.
समारंभाचे अध्यक्ष गिरीश गांधी म्हणाले, भारतीय राजकारणाच्या भयंकर वास्तवाला भारतीय समाजाची ढासळलेली नितीमत्ता कारणीभूत आहे. लोकशाहीचे महत्त्वाचे स्तंभ बेजबाबदार झाल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. नैतिक मूल्यांशिवाय केलेल्या राजकारणातून काहीही चांगलं निर्माण होण्याची शक्यता नाही. महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा लोकशाही संपुष्टात आल्याचेच उदाहरण आहे. सामान्य माणसाच्या हिताची जनआंदोलनं थांबल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
‘ संविधान आणि भारतीयत्व’ या पुस्तकावर डॉ. अनमोल शेंडे यांनी तर ‘कविवर्य भाऊ पंचभाई’ या पुस्तकावर डॉ प्रकाश राठोड यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शैलेंद्र लेंडे, सुत्रसंचलन प्रशांत वंजारे आणि आभार डॉ. कोमल ठाकरे यांनी मानले. यावेळी ज्योतीक ढाले, सुशिल मेश्राम, सर्जनादित्य मनोहर, करन सातपुते, शेरू सैय्यद, युवराज मानकर, खेमराज भोयर, समीता पंचभाई, मॅक्झिम मनोहर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
चौकट
माजी मंत्री डॉ.नितीन राऊत म्हणाले, ‘भारतीय संविधान आणि भारतीयत्व’ या पुस्तकाचे प्रकाशन केवळ एका ग्रंथाचे प्रकाशन नव्हे तर भारताचे खरे स्वभान उलगडणाऱ्या प्रज्ञेचे अनावरण आहे. हजारो वर्षांची गुलामी मोडतांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे नवे भविष्य लिहिले त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी ‘भारतीय संविधान आणि भारतीयत्व’ हा ग्रंथ उजेडवाटेचे काम करेल.