विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बदनामीप्रकरणी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
यवतमाळ,दि.24 मे (शनिवार):
सोशल मीडियावर काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्या विरोधात खोटा व एडिट केलेला फोटो प्रसारित करून त्यांची बदनामी करण्यात आल्याच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज दिनांक 24 मे ( शनिवार) रोजी जिल्हाधिकारी,यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.सदर फोटोत राहुल गांधी यांना पाकिस्तानशी संबंधित एका युट्यूबर महिलेसोबत दाखवून देशविरोधी संगतीचा खोटा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा फोटो संजय फडणवीस यांनी सोशल मीडियावर प्रसारित केला असून, ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू आहेत. युवक काँग्रेसने या कृत्याचा तीव्र निषेध केला असून, यामागे राजकीय द्वेष, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हेतू व दिशाभूल करणारा प्रचार असल्याचे म्हटले आहे.
मुख्य मागण्या:
-संजय फडणवीस यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा
-सायबर सेलमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी
-अशा खोट्या व दिशाभूल करणाऱ्या कंटेंटवर नियंत्रण ठेवावे
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बंधूच्या वागणुकीबाबत स्पष्टीकरण द्यावे
-जर या प्रकरणात त्वरीत कारवाई झाली नाही,तर युवक काँग्रेसकडून राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी उपस्थितांमध्ये शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. बबलू उर्फ अनिल देशमुख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे, युवक काँग्रेसच्या राज्य सचिव आयुषी देशमुख, सोशल मीडिया काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके, युवक काँग्रेस शहराध्यक्ष निशांत नैताम,सुरज बोढे, वृषभ गुल्हाने,अभिजीत यादव, फैजल पटेल,राजू गवळी, अर्पित शेरेकर, प्रितेश वाघमारे, सुरज ऊले, किसन भोयर, गौतम कांबळे, हिमांश देशभ्रतार, जीवन ठाकरे, चेतन घरत, अथर्व भोयर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.