राज्यातील ओबीसी समुदायाचा दुसरा महामेळावा हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर होणार आहे. या मेळाव्यासाठी चार लाख ओबीसी बांधव एकवटणार आहे. येत्या 26 नोव्हेंबर रोजी हिंगोलीत ही सभा होणार आहे. मात्र, ही सभा उधळून लावण्याचा इशारा स्वराज्य पक्षाने दिला आहे.
भुजबळांची सभा उधळणार’
‘छगन भुजबळांनी त्यांचा लढा लढवा, ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. अन्यथा 26 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे होणारी छगन भुजबळ यांची ओबीसींची सभा उधळून लावू, असा इशारा स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधव देवसरकर यांनी दिला आहे.
राज्यातील ओबीसींचा दुसरा महामेळावा हिंगोलीतील रामलीला मैदानावर होणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली ओबीसीच्या महामेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. चार लाख ओबीसी बांधव या मेळाव्यासाठी एकवटणार असल्याने आयोजकांच्या वतीने विशेष अशी व्यवस्था करण्यात येत आहे.
या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, प्रकाश शेंडगे यांची उपस्थिती असणार आहे. या महामेळाव्याला येणाऱ्या ओबीसी बांधवांच्या वाहनांसाठी हिंगोली शहराच्या प्रमुख पाच महामार्गांवर दीडशे एकरपेक्षा अधिक जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.