मलेरिया हा आजार दुर्धर नसला तरी योग्य वेळी उपचार न मिळाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो.
हा आजार पावसाळ्यात जास्त प्रमाणातजरी होताना दिसत असला तरी उन्हाळ्यात डबके दूषित पाणी साचलेले डबके कुलर टायर यातील पाण्यात मलेरिया चे डास आढळतात.
२५एप्रिल २०२४, आज जागतिक मलेरिया दिन, सर्वांना माहित असेल की, हा आजार मच्छरांमुळे होतो. घराच्या आसपास असलेल्या घाणीत मलेरियाच्या डासांची पैदास होते. हे मलेरियाचे डास मानवी रक्त पितात आणि त्यातून संसर्ग होऊन रुग्णाला मलेरियाची लागण होते.
या आजारात ताप येतो, थंडी वाजते आणि घाम मोठ्या प्रमाणावर येतो. या आजारापासून लहान मुलांचे रक्षण कसे कराल? या संदर्भात डोंबिवली येथील एम्स हॉस्पिटलचे बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. बॉबी सदावर्ती यानी जागतिक मलेरिया दिनाबाबत महत्त्वाची माहिती दिलीय.
दोन प्रकारच्या डासांमुळे मलेरिया पसरतो
डॉक्टर म्हणतात, प्लाज्मोडियम या परजीवी विषाणूमुळे मलेरिया होतो. भारतात प्लाज्मोडियम विवेक्स आणि प्लाज्मोडियम फॅल्किपरम या दोन प्रकारच्या डासांमुळे मलेरिया पसरतो. संक्रमित एनोफेलस मच्छराच्या चावण्याने मलेरिया पसरतो. दुर्लक्ष केल्यास किंवा वेळेवर उपचार न केल्यास हा आजार जीवघेणा बनू शकतो. लहान मुलांना मलेरियाचा अधिक धोका असतो कारण प्रौढांच्या तुलनेने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते.
यामुळे त्यांच्या शरीराला संसर्गाशी लढणे आव्हानात्मक ठरते. लहान मुलांमध्ये यांचे निदान उशिरा होते आणि हा मलेरिया लवकर गंभीर रुप धारण करु शकतो. यामुळे मेंदूला सूज येणे, अशक्तपणा किंवा इतर अवयवांना गंभीर नुकसान होणे यासारख्या गुंतागुंती होऊ शकतात.
मुलांचे मलेरियापासून संरक्षण कसे कराल?
पालक म्हणून तुमच्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत साधे बदल करून सुरुवात करा ज्यामुळे मोठा फरक पडू शकतो. तुम्ही मुलांना योग्य कपडे घालत आहात याची खात्री करा. जर ते बाहेर खेळायला जात असतील तर त्यांना पूर्ण बाह्यांचे तसेच संपुर्ण शरीर झाकणारे कपडे घालण्याचा प्रयत्न करा. जेणेकरुन त्यांचे डासांच्या चावण्यापासून संरक्षण होईल. तुमच्या लहान मुलाला मच्छरदाणीत झोपवा, विशेषतः रात्री जेव्हा संक्रमित डास चावण्याचा धोका अधिक असतो. तुमच्या मुलाच्या त्वचेसाठी सुरक्षित आणि सौम्य असलेले डास प्रतिबंधात्मक लोशनचा वापर करा. तुमचे घर तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. डासांची पैदास होण्याची शक्यता अधिक असलेल्या, साचलेल्या पाण्याचा निचरा करा. फुलांच्या कुंड्या, कूलर किंवा बादल्यांमध्ये पाणी साचू देऊ नका. सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष द्या. वेळेवर निदान करण्यासाठी तुमच्या मुलाला मलेरियाशी संबंधित लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.त्यामुळे मलेरियाचे डास ज्या ठिकाणी निर्माण होत असतात आशा ठिकाणी स्वच्छता ठेऊन काळजी घ्यावी.