कवी प्रशांत वंजारे यांना अजातशत्रू राज्यस्तरीय पुरस्कार
११ मे रोजी नाशिक येथे वितरण
आर्णी ( प्रतिनिधी)
परिवर्त बहुउद्देशीय संस्था नाशिकच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरावर लोकप्रबोधन, संशोधनपर लेखन आणि उत्कृष्ट काव्य निर्मितीला सन्मानित करण्यात येते. यावर्षी कवी प्रशांत वंजारे यांना अरूण काळे अजातशत्रू राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. ११ मे रोजी एकदिवसीय परिवर्त साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते वंजारे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यापुर्वी अशोक कोतवाल, मच्छिंद्र चोरमारे, संध्या रंगारी, केतन पिंपळापुरे आदी मान्यवर कवींना हा पुरस्कार मिळाला आहे.
प्रशांत वंजारे यांच्या ‘ आम्ही युद्धखोर आहोत ‘ या बहुचर्चित काव्यसंग्रहाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यापुर्वी या काव्यसंग्रहाला महाराष्ट्रातील प्रतिष्ठित संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. आंबेडकरी विचार व्युहातुन समकालीन अराजकाचे मर्मभेदी शब्दचित्रण सदर काव्यसंग्रहातून करण्यात आलेले आहे. प्रशांत वंजारे यांची शरसंधान ( काव्यसंग्रह) , आंबेडकरी साहित्य: आकलन आणि निरीक्षणे ( समिक्षा) ही महत्त्वाची पुस्तकं सुद्धा प्रकाशित आहेत. कवी आणि कार्यकर्ते असणारे वंजारे हे आंबेडकरी साहित्य व सांस्कृतिक चळवळीत सक्रिय आहेत.
या महत्त्वाच्या पुरस्कारासाठी प्रा. गंगाधर अहिरे, अनिल कांबळे, भाऊ भोजणे, जनार्दन मोहिते, प्रा. विलास भवरे, शेरू सैय्यद, सज्जन बरडे, संजय मोखडे, किरण पतंगे, कपिल दगडे आदींनी प्रशांत वंजारे यांचे अभिनंदन केले आहे.