अखेर घोषणा केल्या नुसार मराठा आरक्षण आंदोलना चे प्रणेते,संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे हे आपले भगवे वादळ घेऊन मुंबईत पोहचले आहे.
दोन दिवसांपूर्वी अंतरवली सराटी येथून गणरायाची आरती करून व शिवरायांना अभिवादन करून मनोज पाटील मुंबई कडे निघाले होते दरम्यान त्यांनी शिवनेरी गडावर जाऊन तेथील माती कपाळी लावली अन मुंबई निघाले आज सकाळी त्यांचा ताफा मुंबईत पोहचला.
१)मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
२). हैदराबाद गझेटियर लागू करा… १३ महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
३). सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.
४). सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
५) आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली
एकीकडे गणेशोत्सावादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज आहेत. तर दुसरीकडे, मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, म्हणून मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे आझाद मैदानाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. आंदोलनादरम्यान लाखोंच्या संख्येने मराठा समाज एकत्र जमणार असल्याने आझाद मैदानात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसंकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.
मुंबईत होणाऱ्या या संपूर्ण आंदोलनादरम्यान सीसीटीव्ही कॅमेराने पाहणी करण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी स्थानिक पोलिसांसह इतर पोलीस ठाण्यातील अतिरिक्त मदत मागवण्यात आली आहे. 27 ऑगस्टला गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या सणाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी विशेष खबरदारी घेताना शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी (29 ऑगस्ट) मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाची हाक दिली. त्यामुळे त्यांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याची तयारी सुरु केली. यावेळेस जरांगे-पाटील यांनी आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन माघार घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने या आंदोलनाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी एक दिवसांची परवानगी दिल्याने राज्यभरात मोठ्या संख्येने मराठा समाज आझाद मैदानाकडे येत आहेत. गुरुवारी (28 ऑगस्ट) सकाळपासून मराठा समाजाचे कार्यकर्ते दक्षिण मुंबईत पोहोचले आहेत. रात्री उशिरापर्यंत ही संख्या अधिक वाढली होती. शुक्रवारी सकाळपर्यंत आझाद मैदानात लाखोच्या संख्येने लोक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी सकाळी आझाद मैदानात तैनात करण्यात आली. या पथकाने संपूर्ण आझाद मैदानाची पाहणी करुन बंदोबस्ताची आखणी केली होती. या पथकासह मुंबई पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असे सुमारे 2 ते अडीच हजार पोलीस तिथे बंदोबस्तकामी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत राज्य राखीव दलाची तुकडी, दंगल नियंत्रण पथक, क्यूआरटी, बॉम्बशोधक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तसेच वाहतूक पोलिसांची मदत घेतली जात आहे.
मुंबईतील मार्गात बदल
आंदोलनामुळे काही मार्गात बदल करण्यात आले आहे. जागोजागी वाहतूक पोलिसांना बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आले आहे. जेणेकरुन वाहतूकीची समस्या निर्माण होऊ नये. जरांगे-पाटील हे नवी मुंबईमार्गे मुंबईत येत असल्याने जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तिथे वाहतूकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होणार असल्याने स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
अमीत शहा यांचा मुंबई दौरा
गणेशोत्सव, मराठा समाजाचे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा हे दोन दिवसांच्या मुंबई दौर्यावर येणार आहेत. शुक्रवारी (29 ऑगस्ट) अमीत शहा मुंबईत आल्यानंतर लालबागचा राजासह इतर प्रमुख गणेशोत्सव मंडळ, काही भाजप नेत्यांच्या घरी जाऊन दर्शन घेणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय सुरक्षेसह मुंबई पोलिसांनी अतिरिक्त तुकडी त्यांच्यासोबत ते जिथे जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत असणार आहे. या तिन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच बंदोबस्तात कुठेही हलगर्जीपणा होणार नाही यासाठी पोलिसांना विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहे.