पत्रकारितेची वापरून ‘ढाल’ त्यांनी जमावतात लाखोंचा‘माल’
राजूर कॉलनीतील अवैध धंद्यांवर मनसेचा ‘फटका’
वणी प्रतिनिधी :
तालुक्यातील राजूर कॉलनी परिसरात पत्रकारितेची ‘ढाल’ वापरून काही लोक सर्रासपणे वरली मटका आणि इतर अवैध धंदे चालवत आहेत, असा गंभीर आरोप जनतेतून होत असताना या गंभीर मुद्द्याला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता थेट संघर्ष सुरू केला आहे. तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी वणी पोलिसांना दोन दिवसांत या अवैध धंद्यांवर निर्णायक कारवाई करण्याचा थेट अल्टिमेटम दिला आहे. जर पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेले हे धंदे तात्काळ बंद झाले नाहीत, तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
▪️पत्रकारितेचा बुरखा आणि गुन्हेगारीचा सुळसुळाट
राजूर कॉलनीतील सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडले असून, अनेक तरुणांना व्यसनाधीन करून कुटुंबे उद्ध्वस्त करण्याचे काम या अवैध धंद्यांमुळे सुरू आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हे धंदे चालवणारे काही लोक स्वतःला पत्रकार किंवा राजकीय नेते म्हणून मिरवतात. त्यांच्या या ‘पत्रकारितेच्या’ बुरख्यामुळे पोलिसही कारवाई करण्यास धजावत नाहीत, असा स्थानिकांचा आरोप आहे. हे लोक केवळ पत्रकारितेची ढाल म्हणून वापरून लाखोंचा ‘माल’ (पैसा) कमावत आहेत, त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
▪️मनसेचा ‘अल्टिमेटम’: आता थेट कारवाई करा!
या गंभीर परिस्थितीची दखल घेत मनसेने वणी पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले आहे. गोहोकार यांनी निवेदनात म्हटले आहे की, “या अवैध धंद्यांमुळे परिसराची शांतता भंग झाली आहे. पोलिसांनी यावर तात्काळ लक्ष घालून दोन दिवसांच्या आत कठोर कारवाई करावी. अन्यथा, मनसे राजूरच्या सामाजिक सलोख्यासाठी गप्प बसणार नाही.”
यामुळे, आता पोलीस या निवेदनाची दखल घेऊन पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या या गुन्हेगारीवर काय कारवाई करतात, याकडे राजूरमधील नागरिकांचे लक्ष लागून आहे.