7k Network

बुद्धांनी दिलेले विचार इंद्रियाचे दान सर्वश्रेष्ठ : डॉ.यशवंत मनोहर

बुद्धांनी दिलेले विचार इंद्रियाचे दान सर्वश्रेष्ठ

डॉ.यशवंत मनोहर

सुशील मेश्राम यांच्या ग्रंथाचे थाटात प्रकाशन

अवयव दान, देहदान ही दानं महत्वाचीच आहेत. बुद्धाने सांगितलेली दानपारमिता ही श्रेष्ठ पारमिता होय. बुद्धांच्या काळात विचार करण्याचं इंद्रिय व्यवस्थेने मारून टाकले होते. विचार करण्याचा अवयवच व्यवस्थेने नष्ट केला होता. अशा काळात बुद्धांनी विचार करण्याच्या इंद्रियाचं दान सामान्य माणसाला दिले. हे विचार इंद्रिय सर्व इंद्रियांना जिवंतपणा देणारे इंद्रिय आहे. हे विचार इंद्रिय इतर सर्व इंद्रियांना अर्थपूर्ण करणारे आहे. विचार इंद्रियाचं दान हे व्यक्तिगत पातळीवरचे नसून सार्वजनिक पातळीवरचे आणि कालातीत आहे. प्रत्येक कालखंडात शोषण व्यवस्था नष्ट करण्यासाठी विचार इंद्रियाचा उपयोग होतो. विचार इंद्रियाचं दान नसेल तर इतर दानं ही निरर्थक ठरतील त्यामुळे बुद्धांनी दिलेले विचार इंद्रियाचं दान सर्वश्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.
ते प्रा. सुशील मेश्राम यांनी संपादित केलेल्या ‘ बुद्धिझम आणि देहदान, अवयवदान’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते. या प्रकाशन समारंभाचे आयोजन दि शेड्युल्ड कास्ट ॲन्ड बुद्धिस्ट पेंशनर असोसिएशन या समाजसेवी संस्थेने केले होते. पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम करूणा भवन, बजाज नगर येथे पार पडला.

डॉ. मनोहर म्हणाले अवयव दान आणि देहदानाच्या संदर्भात समाजात अनेक गैरसमज पसरलेले असून ते दुर करणे गरजेचे आहे. देहदानाची चळवळ ही लोकचळवळ व्हायला हवी. देहदान, अवयवदानाची चळवळ समृद्ध होण्यासाठी डॉ.सुशील मेश्राम करत असलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे असून ‘बुद्धिझम आणि देहदान,अवयवदान’ हा ग्रंथ अनेकार्थाने महत्त्वाचा आहे.

‘बुद्धिझम आणि देहदान, अवयवदान’ या पुस्तकावर डॉ. प्रकाश राठोड यांनी सटिक भाष्य केले. अविनाश पाटील, डॉ. अनुप मरार, डॉ. अरूण कसोटे, डॉ. बी. जी. वाघमारे यांनी विषयाच्या अनुषंगाने आपले विचार मांडले. प्रास्ताविकातून डब्ल्यू. एल. फुसाटे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संपादनाची भूमिका डॉ. सुशील मेश्राम यांनी मांडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत वंजारे यांनी केले तर आभार घनश्याम धाबर्डे यांनी मानले. यावेळी विचार मंचावर डी.एम.आटे, युगसाक्षी प्रकाशनाचे नितीन हनवते हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!