माळेगावच्या अभिमानात अजून एक तुरा
अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलगा शिवम चौधरी याने दहावीत मिळवले 94% गुण
सावळी सदोबा:-आर्णी तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षणासाठी जिद्दीने संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांचे उदाहरण म्हणून माळेगाव येथील शिवम संजय चौधरी हे नाव आता गर्वाने घेतले जात आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरातून आलेल्या या विद्यार्थ्याने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत तब्बल 94% टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.या यशामुळे माळेगावसह परिसरात आनंदाचे आणि गौरवाचे वातावरण निर्माण झाले आहे.शिवमचे वडील संजय चौधरी हे मोलमजुरी करताना स्वतःची थोडीशी शेतीदेखील करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत घर चालवतानाही त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणात कोणतीही अडथळा येऊ दिली नाही. योग्य शिक्षणासाठी शिवमला हिवरा येथील त्याच्या मामाकडे पाठवण्यात आले, जेथे त्याने स्थानिक विद्यालयात शिक्षण घेतले.शिवमने उपलब्ध साधनसंपत्ती अभाव असूनही हार मानली नाही. विद्युत उपकरणे, मोबाईल, इंटरनेट अशा कोणत्याही आधुनिक सुविधांचा अभाव असतानाही,त्याने शाळेतील शिक्षकांचं मार्गदर्शन आणि स्वतःची प्रचंड मेहनत यांच्या जोरावर अभ्यासात सातत्य ठेवले.त्याच्या अभ्यासातली चिकाटी, आत्मविश्वास आणि कष्ट यांचा अखेर सुफळ संकल्प झाला.शाळेचे मुख्याध्यापक सांगतात,“शिवम हा नेहमीच अभ्यासू,शांत आणि शिस्तप्रिय विद्यार्थी होता. त्याच्या यशामागे त्याची मेहनत,जिद्द आणि कुटुंबाचा पाठिंबा आहे.शिवम आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मामा आणि शिक्षकांना देतो. त्याचे स्वप्न IAS अधिकारी बनण्याचे असून, त्यासाठी तो अधिक कठोर परिश्रम घेणार असल्याचे त्याने ठामपणे सांगितले.गावकऱ्यांनी त्याच्या यशाचे कौतुक केला असून, त्याच्या पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. शिवम चौधरी आता माळेगावचा अभिमान ठरला आहे,जिथे कष्ट,जिद्द आणि स्वप्नांची जोड भविष्यातील यशाला आकार देते.
