चित्रपट, टीव्ही चा लहान पडदा गाजविणारे आपल्या रोखठोक पुरोगामी विचार स्पस्टपणे व उघड उघड मांडताना परिणामाची कधीच परवा न करणाऱ्या बेधडक अभिनेता किरण माने हे संत तुकोबांच्या विचारांचा प्रसार करत असतात आपल्या फेसबुक प्रोफाइल वरून ते वेवगळ्या विषयावर मत प्रदर्शित करत असतात.
स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी रचला त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहणारी पोस्ट त्यातील शब्द रचना अनेकांना आवडली असून त्या फेसबुक ची चर्चा आता पुरोगामी विचारवंत असलेल्या मंडळीत होत आहे.
“स्त्रीने बालपणी पित्याच्या आज्ञेने आणि संमतीने वागावे. तिने कधीही स्वतःच्या मताने वागू नये. पिता, पती, पुत्र यांना सोडून स्वतंत्र राहणारी स्त्री दोन्ही कुळांना निंदनीय असते. पती हा मनाविरुद्ध वागला तरी पत्नीने प्रसन्न मुद्रेने राहावे. आपल्या पित्याने किंवा भावाने ज्याच्याशी लग्न लावले तो जिवंत असेपर्यंत त्याचीच सेवा करावी. त्याच्या मरणानंतरही तिने दुसरा नवरा करू नये. कारण लग्नामध्ये होम-हवन करुन तिला ज्याच्या ताब्यात दिले, तेच तिच्या पतीचे स्वामित्वाचे कारण आहे. पतीच तिचा मालक बनतो. त्याची आराधना व सेवा करावी पती दुर्व्यसनी असो किंवा परस्त्री गमन करणारा असो, त्याला विद्या नसली, अपंग असला तरी तिने त्याला देवासामान मानावे. स्त्रियांना पतीखेरीज दुसरा देव नाही. पतीसेवा हीच तिला स्वर्गप्राप्तीचे एकमेव साधन आहे. तिने पती निधनानंतर अल्प आहार करावा. ब्रह्मचर्य पाळावे. कारण ब्रह्मचर्यामुळे स्वर्ग मिळतो.”
…वर्चस्ववाद्यांना पूजनीय असलेल्या आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलेल्या मनुस्मृतीतल्या पाचव्या अध्यायातल्या फक्त १४८ ते १५५ क्रमांकांच्या श्लोकांची ही झलक आहे मित्रांनो ! बाकी संपूर्ण बारा अध्यायांच्या ग्रंथात, “स्त्रीचा वापर प्रजननासाठी कसा करावा… उच्चवर्णीय पुरूष जेवायला बसलेला असताना डुक्कर, कुत्रा, शूद्र, षंढ आणि रजस्वला (मासिक पाळी आलेली) स्त्री यांना त्याच्या नजरेसमोर आणु नये. उच्चवर्णीय पुरूष जेवण करून निघून गेल्यावर, जमिनीवर पडलेले उष्टे अन्न त्यांनी ‘प्रसाद’ म्हणून खावे…” वगैरे वगैरे इतकी विकृत घाण भरलेली आहे की, त्या नीच पातळीचा विचारही करू शकणार नाही तुम्ही.
याच मनुस्मृतीला महात्मा फुले यांनी “स्त्रीयांना आणि शुद्रांना गुलामगिरीत लोटणारा एक नंबरचा शत्रू” म्हणून उडवून लावले… पत्नी सावित्रीबाईंना शिक्षणाचे, आचारविचारांचे पूर्ण स्वातंत्र्य दिले… याचा सावित्रीबाईंनी समाजातल्या इतर स्त्रीयांसाठी पुरेपुर उपयोग केला. मनूवाद्यांच्या जोखडात अडकलेल्या स्त्रीया आणि शूद्रातिशूद्रांना मुक्त करण्यासाठी पतीसोबत घर सोडले. मनूवाद्यांच्या अर्वाच्य ट्रोलींगला जुमानले नाही. शेण,दगडगोट्यांचा मारा झेलला… मागे हटल्या नाहीत !
आई, तुझे आभार कसे मानू? कुठल्या शब्दांत मानू? तुला त्रास देणार्या मनूवादी लोकांची पिलावळ आज विद्येची देवता म्हणुन सरस्वती देवीला पुजते… पण तुझी मात्र ते आजही हेटाळणी करतात. खरंतर त्यांच्या घरातल्या महिलाही आज ज्या स्वातंत्र्याचा, शिक्षणाचा उपयोग करून घेत आत्मसन्मानानं जगताहेत, ते तुझ्या संघर्षाचं फळ आहे ! या देशातलं खरं विद्येचं, ज्ञानाचं प्रतिक तू आहेस. तुझे विचार, तुझा संघर्ष घराघरातल्या मुलामुलींना शिकवायला हवा…
सावित्रीआई, तुला लै लै लै प्रेम… आणि एक घट्ट मिठी !
– किरण माने.
(अभिनेता)