जिल्ह्यात वाळू चोरीविरोधात मोठ्या प्रमाणावर कार्यवाही करा;विभागीय आयुक्त श्वेता सिंघल
विभागीय आयुक्तांकडून विविध बाबींचा आढावा
खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील रेती चा मुद्दा काढत अधिकारी लोकांची खरडपट्टी काढली होती. आता विभागीय आयुक्त यांनीही या संदर्भात कठोर भूमिका घेत आढावा बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना कारवाई चे निर्देश दिले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळु चोरीच्या घटना पुढे येत आहे. अशा प्रकारे वाळू चोरी होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर मोठ्या प्रमाणावर कार्यवाही करा. उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी याकडे विशेष लक्ष द्यावे. याबाबत केलेल्या कार्यवाहीचा पुढील महिन्यात स्वतंत्र आढावा घेण्यात येतील, असे विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे विभागीय आयुक्तांनी महसूल, जिल्हा परिषद, जलसंधारण, पाणी टंचाई आदी विविध विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिारी सुदर्शन गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वाळू चोरी अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे संपुर्ण जिल्हाभर वाळू चोरीविरोधात मोठ्या प्रमाणावर कार्यवाही करा. महसूल कर्मचाऱ्यांना रेती चोरट्यांकडून मारहाणीसारखे प्रकार होत असल्यास आणि वारंवार रेती चोरीच्या घटनेत सहभागी असल्याचे आढळल्यास अशा व्यक्तींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देखील विभागीय आयुक्तांनी दिले.