शेती बेभरवशाची ठरत आहे शेतकरी आत्महत्या यामुळे तरुणांचा कल शेती सोडून नोकरी व्यवसाया कडे आहे पण शिक्षण घेऊनही नोकरी मिळेलच असे नाही.शेतीला आधार म्हणून शासनाने जोड धंदा म्हणून मासे,खेकडे,पालन,ककुट पालन, शेळी पालन रेशीमशेती,मशरूम शेती,केसर उत्पादन, करण्यासाठी शासन कर्ज तर देते शिवाय त्यावर सबसीडी देखील देते.
खास करून सहज करता येण्या जागा शेती पूरक व्यवसाय म्हणजे शेळी पालन (गोट फार्मिंग)आता याकडे शेतकऱ्यांनाचे शिक्षित मुले वळताना व त्यात यशस्वी होताना दिसत आहेत.
आता पश्चिम महाराष्ट्रात देखील शेती ला जोड धंदा मोठया प्रमाणावर होत आहे. शिंदेवाडी(ता.करवीर,जि.कोल्हापूर) येथील पंकज कृष्णात पाटील या उच्चशिक्षित युवकाने शेळीपालनामध्ये चांगली प्रगती केली आहे. जातिवंत शेळ्यांचे संगोपन, आरोग्य व्यवस्थापन आणि थेट शेतकऱ्यांना शेळ्या, बोकडांची विक्री करत अर्थकारण सक्षम केले आहे. शिंदेवाडी(ता.करवीर,जि.कोल्हापूर) गावातील पंकज पाटील यांची अडीच एकर शेती आहे. यामध्ये दोन एकर क्षेत्रात ऊस आणि पंचवीस गुंठ्यात चारा पिकांची लागवड असते. बाजारपेठेचा अभ्यास करत तीन वर्षापूर्वी त्यांनी शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला. पंकज यांनी बी.टेकची पदवी घेतली आहे. पदवीनंतर त्यांनी कॅड कॅमचाही अभ्यासक्रम पूर्ण केला. परंतू नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीपूरक व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला. यासाठी पोल्ट्री, पशुपालन, शेळीपालन आदि विषयांचा अभ्यास केला. यानंतर शेळी पालन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी शेळीपालनाचे दोन दिवसीय प्रशिक्षण देखील घेतले. बंदिस्त शेळी,मेंढीपालन २७ वर्षाच्या पंकज पाटील यांनी २०१७ साली शेळीपालनास सुरुवात केली. यासाठी शेतामध्ये पाच गुंठे क्षेत्रावर साठ फूट बाय नव्वद फूट आकाराचे बंदीस्त शेळीपालनासाठी शेड उभारले आहे. काही क्षेत्र शेळ्यांना फिरण्यासाठी मोकळे ठेवले आहे. शेडमध्ये सहा कप्पे आहेत. यामध्ये पिलांसाठी स्वतंत्र चार कप्पे आहेत. शेडच्या कडेने जाळीचे कुंपण केले आहे. जातिवंत बिटल,सिरोही आणि सोजत जातीच्या शेळ्यांच्या संगोपनावर पाटील यांचा भर आहे. सुरवातीला पंचवीस शेळ्यांची खरेदी करून त्यांनी व्यवसायास सुरुवात केली. यामध्ये बीटल सहा, सिरोही अकरा आणि सोजत जातीच्या सात शेळ्या होत्या. सध्या शेडमध्ये शेळ्या, बोकड मिळून संख्या ६० आहे. याचबरोबरीने पाटील यांनी २० गावठी नर मेंढ्यांचे संगोपन केले आहे. सकाळी सहा वाजता शेळ्यांचे व्यवस्थापन सुरु होते. पहिल्यांदा शेळ्यांच्या पिल्लांना दूध पाजण्यासाठी सोडले जाते. त्यानंतर जादा झालेले दूध काढून घरच्यांसाठी वापरले जाते. शेडची स्वच्छता करून सकाळी दहा वाजता आणि सांयकाळी पाच वाजता शेळ्यांना चाराकुट्टी आणि खाद्य मिश्रण दिले जाते. गरजेनुसार शेळ्यांना ताजे पाणी मिळेल याची व्यवस्था केलेली आहे. अडचणींवर केली मात पंकज पाटील यांना सुरवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चाऱ्यातील विषबाधेमुळे पहिल्या वर्षामध्ये तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. मरतूक कमी करण्यासाठी त्यांनी प्राधान्याने प्रयत्न केले. पशुतज्ज्ञांशी सातत्याने संपर्क साधत विविध आजार आणि उपचाराबाबत तांत्रिक माहिती घेतली. प्रशिक्षणदेखील घेतले. त्यानुसार शेळ्यांच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्यास सुरवात केली. याचा चांगला फायदा झाला. गेल्या दोन वर्षात शेळ्यांची मरतूक पूर्णपणे थांबली आहे. आजाराची लक्षणे दिसताच तातडीने औषधोपचार केले जातात. गंभीर आजार असेल तर तातडीने पशूतज्ज्ञांना शेडमध्ये बोलावून शेळ्यांवर उपचार करण्यावर पाटील यांचा भर आहे. शेळीपालनातून उपलब्ध होणाऱ्या लेंडीखताचा वापर जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी केला जातो. त्यामुळे येत्या काळात ऊस उत्पादन वाढविण्याचा पाटील यांचा प्रयत्न आहे. लसीकरणावर भर शेळ्या, मेंढ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी वेळापत्रक आणि पशूतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार लसीकरण केले जाते. प्रामुख्याने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये लाळ्या खुरकूत, डिसेंबरमध्ये पीपीआर (तीन वर्षातून एकदा), मार्च-एप्रिल-मे महिन्यात २१ दिवसांच्या अंतराने लाळ्या खुरकूत, घटसर्प आणि आंत्रविषाराची लस दिली जाते. याशिवाय गरजेनुसार जंतनाशकाची मात्रा शेळ्या,मेंढ्यांना पाजली जाते. वेळेवर लसीकरण आणि औषधोपचारामुळे शेळ्या- मेंढ्यांचे आरोग्य चांगले राहिले आहे. त्यांच्या वजनामध्येही चांगली वाढ होते. गांडूळखत,दूध विक्रीचे नियोजन शेळीपालनातील नफा वाढविण्यासाठी पंकज पाटील यांनी शेळी दुधाची विक्री आणि लेंडीपासून गांडूळ खत निर्मितीच्यादृष्टीने नियोजन केले आहे. याचबरोबरीने मटण व्यावसायिकांशी संपर्क साधून मागणीनुसार ग्राहकांना थेट मटण विक्रीचा त्यांचा प्रयत्न आहे. योग्य गुणवत्तेच्या खाद्यावर भर
व्यवसाय सुरु करताना पाटील यांनी शेळ्यासाठी गुणवत्तापूर्ण खाद्याची जुळवाजुळव सुरू केली. अनुभवाने किफायतशीर दरात चारा खरेदी केली जाते. शेळ्यांना खाद्य देताना त्यामध्ये विविधता ठेवली आहे. यामुळे शेळ्यांना सकस चारा आणि पोषक खाद्य मिळते.
दररोज साठ शेळ्या आणि २० नर मेंढ्यांना हिरवा,सुका चारा कुट्टी आणि मका, शेंग पेंड,
भरडा दिला जातो. गाभण व व्यायलेल्या शेळ्यांना जादा प्रमाणात खाद्य मिश्रण दिले जाते. गरजेनुसार खनिज मिश्रण दिले जाते. चाऱ्यांमध्ये विविधता ठेवलेली आहे.
शेतामध्ये हत्ती गवताची लागवड केली आहे. ओला चारा म्हणून त्याचा वापर होतो. सुका चाऱ्याचा साठा करून ठेवला जातो.
उन्हाळ्यात मका, शाळू, बाजरीपासून मुरघास तयार करुन ठेवला जातो. पावसाळ्यात हिरवा चारा वापरला जातो. याशिवाय हरभरा, तूर भुसा वापरला जातो.
खाद्यामध्ये सोयाबीनचा वापर केला जातो. एका वर्षासाठी तूर भुसा साठ टन आणि हरभरा भुसा पाच टन लागतो. सुक्या खाद्याचे संकलन करण्यासाठी पिकांच्या हंगामानुसार कर्नाटकातून भुसा, हरभऱ्याची खरेदी केली जाते.
शेळी पालन व्यवस्थापनात खाद्यावरचा खर्च जितका कमी करता येईल तितके फायद्याचे ठरते.
शेतकरी, बाजारपेठांशी सातत्याने संपर्क ठेवून किफायतशीर दरात चाऱ्याची उपलब्धता करण्यावर भर.
थेट शेतकऱ्यांना बोकडांची विक्री शेळी फार्म सुरु केल्यानंतर सहा महिन्यानंतर पहिल्या शेळीची विक्री झाली. यानंतर लोकांच्या संपर्कातूनच पंकज पाटील यांनी करडे आणि बोकडांची विक्री सुरु केली. गेल्या तीन वर्षात पाटील यांनी फार्मची कोठेही जाहिरात केली नाही. शेळी, बोकड घेऊन गेलेले ग्राहक इतर शेतकऱ्यांना फार्मची माहिती देतात. पाटील साधारणतः महिन्याला एक ते दोन बोकडांची विक्री करतात. बिटल व बिटल संकर असलेल्या बोकडाची विक्री ४५० ते ५०० रुपये किलो या दराने केली जाते. सिरोही व सोजत जातीच्या बोकडाची विक्री ३५० ते ४०० रुपये दराने होते. व्यापाऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांशी वैयक्तिक संपर्काचे जाळे आतापर्यंत विक्री व्यवस्थेसाठी महत्त्वाची बाब असल्याचे पाटील सांगतात. साधारणपणे दीड वर्षानंतर शेळीपालन व्यवसायातील नफा सुरू झाला. मागणीनुसार जातिवंत शेळ्या,बोकडांची पाटील विक्री करतात. गेल्यावर्षी शेळीपालनाचा खर्च वजा जाता तीन लाखांचा नफा पाटील यांनी मिळाला. त्याचबरोबरीने दरवर्षी १० ट्रॉली लेंडीखताची विक्री केली जाते. यातून चाळीस हजारांची मिळकत होते. समन्वयामुळे व्यवसायात स्थिरता सध्या पंकज यांच्याकडे शेळ्या, बोकडांच्या विक्री, वडील कृष्णात आणि आई सौ.सूमन यांच्याकडे गोठ्याची देखभाल आणि शेळ्यांच्या खाद्य व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. दोघांच्या समन्वयामुळे शेळीपालन व्यवसाय फायदेशीर झाला आहे. सध्या शेळ्यांची संख्या वाढल्याने एक मजूर कामासाठी घेतला आहे. पंकज यांनी परिसरातील प्रयोगशील शेळीपालक त्याचबरोबरीने विविध तज्ज्ञांशी चर्चाकरून स्वतःच्या शेळीपालन व्यवसायात सातत्याने बदल केले. त्यामुळे कमी खर्चात चांगल्या प्रकारे शेळीपालन करणे त्यांना शक्य झाले आहे. आजपर्यंत त्यांनी चाळीसहून अधिक शेळी व्यावसायिकांच्या भेटी घेतल्या आहेत. दरवेळी नवनवीन संकल्पना वापरून शेळीपालनातील नफा कसा वाढविता येईल, यासाठी पाटील प्रयत्नशील आहेत. संपर्क ः पंकज पाटील, ८२०८५६०३७६