आज यशवंत मनोहर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन..
यवतमाळ ( प्रतिनिधी)
सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांच्या ‘संविधान आणि भारतीयत्व’, ‘कविवर्य भाऊ पंचभाई’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ लोकसेवानगर नागपूर येथे आज ( दिनांक ३ ऑगस्ट) संपन्न होणार आहे. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री नितीन राऊत आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत.
दोन्ही पुस्तकांवर डॉ. अनमोल शेंडे व डॉ.प्रकाश राठोड हे भाष्य करणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.कोमल ठाकरे तर सुत्रसंचलन प्रशांत वंजारे हे करणार आहेत.
यशवंत मनोहर यांनी ‘संविधान आणि भारतीयत्व’ या पुस्तकात जातीवर्णविहीन, स्त्रीपुरूषविषमताविहीन , वर्गविहीन, धर्मनिरपेक्ष आणि सर्वमानवसमभावी संविधाननितीची गंभीर मांडणी केली आहे. तर ‘कविवर्य भाऊ पंचभाई’ या पुस्तकात डॉ. मनोहर यांनी स्मृतीशेष भाऊ पंचभाई यांच्या कवितेचा आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या जीवनाचा जैव अनुबंध चितारलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन अ.भा. आंबेडकरी साहित्य संसद शाखा नागपूरच्या वतीने करण्यात आले आहे.