रक्ताचा रंग कसा म्हटले की आपसूकच लाल हे उत्तर येते पण कडकनाथ जातीची अशी एक कोंबडी आहे जीचा रंग तर काळा आहेच पण रक्त व मास देखील काळे असते.मांसाहार करणारे खवय्ये चढ्या दरात कडकनाथ ची खरेदी करतात.
काळा रंग, काळी चोच, काळी जीभ, काळं मांस आणि काही प्रमाणात काळं रक्त… ही ओळख आहे कडकनाथ कोंबडीची! अशुभ मानला गेलेला काळा रंग विदर्भातल्या काही महिलांसाठी मात्र चांगलाच फायद्याचा ठरत आहे. या महिला शेतकरी कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय करून सक्षम होत आहेत.
मध्य प्रदेशातल्या खरगौन परिसरात प्राचीन काळापासून कडकनाथ कोंबड्यांचं पालन करतात. कडकनाथ कोंबड्यांचं पालन करण्याचा हा व्यवसाय आता विदर्भातही चांगलाच लोकप्रिय होत आहे.
मध्य प्रदेशने ‘रॉयल चिकन’ अशी प्रसिद्धी केल्यानंतर कडकनाथची लोकप्रियता वाढली. नागपूरच्या कुक्कुटपालन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातून कडकनाथच्या कुक्कुटपालनाला चालनाही मिळत आहे.
कापूस आणि सोयाबीन या पारंपरिक पिकांमुळे विदर्भातला शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पारंपरिक शेतीत वाढलेला उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटं यांमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकटही घोंघावत आहे.
अशा शेतकऱ्यांनी कडकनाथ कोंबड्यांचं पालन करण्यावर जास्त भर दिला आहे. विशेष म्हणजे यात महिलांचाही मोठा वाटा आहे.
कडकनाथ कोंबडीची मागणी मोठी आहे. दरही जास्त मिळतात. त्यामुळे आम्ही गडचिरोली जिल्ह्यातून नागपूरमध्ये कडकनाथ पालनाचं प्रशिक्षण घ्यायला आलो आहोत,” असं गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातल्या किरण चौधरी सांगतात.
किरण चौधरी या महिला शेतकऱ्यांप्रमाणेच शेतीला जोड म्हणून विदर्भातल्या अनेक महिला कडकनाथच्या पालनासाठी पुढे आल्या आहेत. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, बुलडाणा, अमरावती अशा अनेक जिल्ह्यांमध्ये कडकनाथचा व्यवसाय चांगला सुरू आहे.
विशेष म्हणजे यवतमाळातल्या जिल्ह्यातील राळेगाव आणि कळंब येथे महिला बचतगटांनी कडकनाथच्या व्यवसायात मिळवलेला नफा पाहून इतर जिल्ह्यांमधले तीन महिला बचतगट आता पुढे सरसावले आहेत.
“नागपूरच्या केंद्रातून आम्हाला कडकनाथच्या पालनाविषयी माहिती मिळाली. आता गावठी कोंबड्यांच्या बरोबरीने आम्ही कडकनाथही पाळणार आहोत. तसंच या व्यवसायाबद्दल इतर महिलांना सांगणार आहोत,” चौधरी यांनी सांगितलं.
कडकनाथचं महत्त्व
आदिवासींमध्ये कडकनाथ ही कोंबडी पवित्र मानली जाते. दिवाळीच्या दिवशी कडकनाथ कोंबडीचा बळी देण्याची परंपरा आजही आदिवासींमध्ये पाळली जाते.
मध्य प्रदेशातील काही आदिवासी जमाती आजही कडकनाथचं रक्त औषधी उपचारांसाठी वापरतात. होमियोपॅथी औषधीचे गुण या रक्तात असल्याचं सांगितलं जातं. मज्जासंस्थेशी संबंधित आजारांवर कडकनाथचं मांस गुणकारी असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
मांसात प्रोटीनचं प्रमाण 91.94 टक्के एवढं असतं, तर या मांसात कोलेस्ट्रॉल अत्यल्प असतं, असं महाराष्ट्र मस्त्य व पशू संशोधन विद्यापीठातील कुक्कुटपालन संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम. एम. कदम यांनी सांगितलं.
कडकनाथ फायद्याचा का?
कडकनाथची वाढ गावठी कोंबडीप्रमाणे होते. या कोंबडीची उंची जास्तीत जास्त दीड फुट आणि वजन दोन ते अडीच किलो एवढं असतं. दीड वर्षांच्या कोंबडीची वाढ पूर्ण झाल्याचं मानतात.
पाच महिन्यांच्या कोंबडीचं वजन 900 ते 950 ग्रॅम एवढं भरतं. या कोंबडीत चरबीचं प्रमाण कमी असतं.
विशेष म्हणजे इतर कोंबड्या 200 ते 400 रुपये प्रतिकिलो असताना कडकनाथची किंमत एका किलोसाठी 1200 ते 1500 रुपये एवढी असते.
कडकनाथचं चिकन ढाब्यावर 400 ते 500 रुपये प्रतिप्लेट, पंचतारांकित हॉटेलमध्ये 800 ते 1000 रुपये एवढ्या किमतीत मिळतं.
लखनऊ आणि बंगळुरूच्या काही व्यापाऱ्यांकडे कडकनाथच्या निर्यातीचा परवाना आहे. हे व्यापारी महिला बचतगट किंवा खासगी पोल्ट्रीकडून कोंबड्या विकत घेतात.